पुणे : रेल्वे मेल सर्व्हिस (आरएमएस) मध्ये नोकरी लावतो हे आमिष दाखवून तब्बल १० लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
योगेश संतराम माने व निलेश संतराम माने अशी अटक आरोपींची नावे आहे. तर याप्रकणी एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना रेल्वे मेल सर्व्हिस मध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवले, त्यासाठी त्यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथील रेल्वे मेल सर्व्हिस सेक्शन या छिकाणचे बनावट स्वाक्षरीचे व भारतीय रेलची मुद्रा असलेले जॉइनिंग लेटर बनवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून रोख, गुगल पे द्वारे असे एकूण १० लाख ८१ हजार रुपये घेत नोकरी न लावता फसणूक केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असता पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलीस अंमलदार पांडुरंग पवार यांना बातमी मिळाली की आरोपी हे दुचाकीवरून आले असून ते सध्या पुणे रेल्वे पार्सल गेट समोर येणार आहेत.
पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून पोलिसांनी ८ कागदी लिफाफे ज्यामध्ये खोटी रेल्वेची नियुक्ती पत्रे, ४ बँकेचे चेकबुक, ५ पासबुक, ३ कोरे लिफाफे, १० सेंट्रल रेल्वेचे खोटी नियुक्तीपत्रे, दोन मोबाईल, आयकार्ड कव्हर, २ रेल्वेचे बनावट आयकार्ड, लेस हुक असा एकूण ९९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
याप्रकणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.