लोणी काळभोर (पुणे)- कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परीसरात घराच्या टेरेसवर बॅडमिंटनचे फुल काढत असतांना, घराच्या टेरेसवरुन गेलेल्या विजेच्या तारांना चिकटल्याने पन्नास टक्क्याहुन अधिक भाजलेल्या 10 वर्षीय भाग्यश्री बनसोडे या शालेय विध्यार्थीनीची मागील आठ दिवसापासुन मृत्युशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली. भाग्यश्री बनसोडे हिच्यावर मागील आठ दिवसापासुन पिपंरीमधील एका रुग्णालयात उपचार चालु होते. तिचा रविवारी (ता. 4) रात्री उशीरा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
भाग्यश्री धनाजी बनसोडे (वय १० वर्षे, रा. घोरपडेवस्ती लेन नंबर ११, कदमवाकवस्ती ता. हवेली) ही मुलगी मागील रविवारी घऱाच्या टेरेसवर बॅडमिंटन खेळत होती. या खेळा दरम्यान बॅडमिंटनचे फुल टेरेसच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पडले. हे फुल काढण्यासाठी भाग्यश्री इमारतीवर गेली होती.
टेरेसवरुन गेलेल्या विजवाहक तारांच्या खाली चार फुट उंचीची भित उभारली असल्याने, भाग्यश्री सिडीच्या साह्याने बॅडमिंटनचे फुल काढत असतांना, भाग्यश्री विज वाहक तारांच्या संपर्कात आली. यात तिला तारांचा शॉक बसल्याने, सिडीवरुन खाली कोसळली. यात ती पन्नास टक्क्याहुन अधिक भाजल्याने, कदमवाकवस्ती येथील पत्रकार राम भंडारी, दिगंबर जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला तातडीने पिपंरीमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वैयक्तीक लक्ष घालुन, मागील आठ दिवसाच्या काळात भाग्यश्री बनसोडे हिला चांगल्यात चांगले उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले होते. मात्र रविवारी रात्री उशारी भाग्यश्री हिचा मृत्यु झाला.
घरमालक महादेव खंदारे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होण्याची गरज..
भाग्यश्री बनसोडेचे वडील धनाजी बनसोडे लोणी स्टेशन येथील मालधक्क्यात हमाल असुन, ते घोरपडे वस्ती परीसरात महादेव खंदारे यांच्या बिल्डींगमध्ये भाड्याने राहतात. महादेव खंदारे यांच्या बिल्डींगवरुन विजेच्या तारा गेलेल्या आहेत. बिल्डींग उभी असलेल्या जागेतुन विजेच्या तारा गेलेल्या असल्याने, विज वितरण कंपणीने खंदारे यांनी तारांच्या खाली इमारत बांधु नये याबाबत लेखी कळवले होते.
मात्र खंदारे यांनी विज वितरण कंपणीच्या नोटीशीला झुगारुन इमारत उभारलेली आहे. यापुर्वीच याच इमारतीच्या टेरेसवर विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने, चार जण जखमी झालेले आहेत. भाग्यश्री बनसोडे हिच्या मृत्युसही घरमालक महादेव खंदारे हेच कारणीभुत असुन, संबधितांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होण्याची गरज निर्माण झाली आहे.