पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या सरकारी व्यवहारांच्या पेमेंट स्लिप दाखवून फ्रँचायझी उघडण्याचे आमिष दाखवून पालघरमध्ये एका व्यक्तीला १ कोटी ३१ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूक प्रकरणी वसई तालुक्यातील नालासोपारा येथील जतीन पवार आणि शुभम वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर स्टेशनरी दुकानाचे मालक जिग्नेश गोपानी (५० वर्षे) यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी करून या तरुणांनी तब्बल १ कोटी रुपये खिशात घातले आहेत.
राज्य सरकारच्या ई-पोर्टल फ्रँचायझीमध्ये भागीदारी देण्याच्या नावाखाली तक्रारदार गोपानी यांच्याकडे फी म्हणून एक लाख रुपये मागितले. दोघांनीही सारख्याच वेळा घेतल्या आणि काम सुरू होणार असल्याचे सांगितले. दोघांनी गोपनी यांच्याकडून एकूण एक कोटी ३१ लाख ७५ हजार १०४ रुपये घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची ‘स्वाक्षरी’संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर शनिवारी एफआयआर नोंदवण्यात आला आणि एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.