लोणी काळभोर, (पुणे) : सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या वाघोली (ता. हवेली) येथील तिघांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महादेव संभाजी गर्जे (वय- २१ रा. खांदवे नगर, वाघोली), सागर अंकुश चव्हाण (वय-२० रा. गणेशनगर, वाघोली) व ऋतिक बालाजी पोपळघट (वय – २० रा. डोमखेल वस्ती, वाघोली) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात भारताचा हत्यारबंदी कायदा अंर्तगत गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक कारवाईचा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत गस्त घालीत असताना वाघोली गावचे हद्दीत चोखी धानी रोडवर महादेव गर्जे, वाघोली ते आव्हाळवाडी रोडवर सागर चव्हाण, वाघोली ते डोमखेल वस्ती रोडवर ऋतिक पोपळघट यांच्याकडे कोयते मिळून आले. त्यांना पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मिडिया वर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारे इसमांना सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यांचेवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भारताचा हत्यारबंदी कायदा अंर्तगत गुन्हे दाखल केले आहेत. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांचे मार्गंदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.