सागर जगदाळे
भिगवण:- शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. पण याच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भिगवण (ता.इंदापूर) शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलेली आहे. वर्ग शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने भिगवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दादासाहेब अंकुश खरात (वय-४२ रा. कल्याणी नगर RTO ऑफिस च्या जवळ बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे) याला अटक केली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दादासाहेब खरात हा भिगवण मधील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. खरात हे इयत्ता सहावीचे वर्गशिक्षक आहे. आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून पीडित विद्यार्थिनीचा बुधवारी (ता.१७) विनयभंग केला.
त्यानंतर सदर मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर आज गुरुवारी (ता.१८) ऑगस्ट रोजी शाळेत पालक गेले असता सदर निंदनीय प्रकार उघडकीस आला. शाळेमध्ये त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी शाळेत जाऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर गुन्हा रजिस्टरी दाखल करून सदर गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा जे.एम. एफ सी सो कोर्ट इंदापुर यांना पाठविण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
दरम्यान, सदर शिक्षकाकडून यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये ही अशाच प्रकारची सदर घटना घडलेली होती पण ही घटना शाळेच्या मुख्याध्यापिका व अधिकारी यांनी उघडकीस न आणता सदर शिक्षकाकडून माफी लिहून समज दिली होती. जर त्याच वेळेस ही घटना उघडकीस आणली असती तर आणि अन्य मुलींचा विनयभंग करण्या चे धाडस दाखविले नसते. अशा प्रकारच्या निंदनीय घटनेला जर वेळेतच लगाम घातला असता व शाळेच्या मुख्याध्यापिकेने ही घटना पोलिसांच्या कानावर ती घातली असती तर आजची घटना घडली नसती.