भिगवण : गेल्या दीड ते दोन वर्षापासून विद्युत मोटारी चोरीचे सत्र भिगवण पोलिसांनी उघडकीस आणून दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे.
विश्वजीत उर्फ सुंदर तुकाराम ढवळे, (वय २३), रोहन उर्फ सखराम डोंबाळे, (वय २१, सर्व रा. मदनवाडी, ता. इंदापुर जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अवुधत दादासाहेब जगताप (रा. डाळज नंबर २, ता. इंदापुर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांच्या शेतातील टेस्को कंपनीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची घटना बुधवारी (२० जुलै) घडली होती. याप्रकरणी जगताप यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पाऊस न पडल्याने भिगवण परिसरातील शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. त्यातच शेतातील इलेक्ट्रीक मोटारी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी वर्ग हा आर्थिक संकटात सापडला होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथक तयार केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी विश्वजीत ढवळे व रोहन डोंबाळे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींनी वरील गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १९ इलेक्ट्रीक मोटारी व एक पाण्याचे इंजिन असा एकुण सुमारे २ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दुसऱ्या घटनेत भिगवण पोलिसांनी मोटार सायकल, फिज, एलसीडी टीव्ही यांची चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. नितीन सखाराम हरीहर (वय ३३), सलीम मेहबुब शेख, (वय-
२५, दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी ३ मोटार सायकली,१ इलेक्ट्रीक फिज व १ एलसीडी टीव्ही असा एकुण २ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुदद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींनी या वस्तु कोठून चोरी
करून आणल्या आहेत. त्यादृष्टीने भिगवण पोलीस तपास करीत आहेत.
भिगवण पोलिसांनी हरवलेले १० मोबाईल मिळविण्यात यश
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सन २०२२ ते २०२३ या कालावधी नागरिकांचे मोबाईल मोठ्या प्रमाणात हरवले होते. भिगवण पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेवून हरवलेले एकुण १० मोबाईल असा एकूण सुमारे ३ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केले आहेत.
सदरची कामगिरी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार विठल वारगड, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, आप्पा भांडवलकर यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अमलदार विठठ्ल वारगड, महेश उगले हे करीत आहेत.