शिक्रापूर : वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेमध्ये २६ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्या उपाध्यक्षासह सचिवावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष कैलास सोपान मुंगसे व सचिव मोहन गंगाराम ढगे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संस्थेचे लेखापरीक्षक किरण ज्ञानदेव मोरे (वय ४८, रा. पारगाव ता. दौंड जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील झेड एफ इंजिनिअरिंग कंपनीच्या व्यवस्थापक व कामगारांची झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कैलास मुंगसे व सचिव मोहन ढगे हे कामकाज पाहत आहेत. तर पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी उपलेखापरीक्षक किरण मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, किरण मोरे यांनी पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले असता झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष कैलास मुंगसे व सचिव मोहन ढगे या दोघांनी संगनमत करुन पतसंस्थेच्या कोरेगाव भीमा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यातून धनादेशाद्वारे तब्बल ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी किरण मोरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी कैलास मुंगसे व मोहन ढगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ करीत आहेत.