सुरेश घाडगे
परंडा : पदाचा दुरुपयोग करून शेत रस्त्याचा बोगस ठराव तहसील कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचासह एका सदस्याला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अपात्र ठरविले आहे.
लोणी येथील तक्रारदार विठ्ठल सर्जेराव शिंदे यांनी ॲड. विजयकुमार शिंदे यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाविरूद्ध महाजन यांच्याकडे अपील दाखल केले होते. शिंदे यांनी लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच राणी शिंदे, उपसरपंच विनोद शिंदे व ग्रामपंचायत सदस्या प्रियंका माळी यांच्या विरूध्द तक्रार केली होती.
ऐनापूरवाडी शिवारातील गट नंबर २१ व गट नबंर २२ मधून शेतरस्ता करण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामसेवक यांच्या परस्पर बोगस ठराव जोडून तहसील कार्यालयात दाखल केल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी लेखी तक्रार शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.
या प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाहीस्तव हे प्रकरण विभागीय आयुक्त यांच्याकडे सुनावणीसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ८ फेबुवारी २०२३ रोजी तक्रारदार विठ्ठल शिंदे यांचा तक्रारी अर्ज फेटाळण्यात आला होता.
विभागीय आयुक्त यांच्या निर्णया विरूद्ध तक्रारदार विठ्ठल शिंदे यांनी ॲड.विजयकुमार शिंदे यांच्यामार्फत गिरीश महाजन यांच्याकडे १७ जानेवारी २०२३ रोजी अपील दाखल केले होते.
२१ जून २०२३ रोजी या प्रकरणाची मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ऐनापूरवाडी येथील जमीन गट नंबर २१ व गट नबंर २२ मधून शेतरस्ता करण्याच्या ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने घेतला नसल्याचे पत्र ग्रामसेवक यांनी २८ मार्च २०२२ रोजी तक्रारदार विठ्ठल शिंदे यांना दिले होते.
याचप्रमुख कारणावरून ॲड. विजयकुमार शिंदे यांनी युक्तीवाद करून अर्जदाराची बाजू मांडली. सर्व कागदपत्राची पडताळणी करून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी विभागीय आयुक्त यांचे आदेश रद्द करून विठ्ठल शिंदे यांचे अपील मंजूर केले आहे. त्यामुळे सरपंच राणी शहाजी शिंदे यांना सरपंच व सदस्य पदावरून तर उपसरपंच विनोद पांडूरंग शिंदे यांना उपसरपंचपदावरून व सदस्यपदावरून तर ग्रा.प सदस्या प्रियंका माळी यांना सदस्यपदावरून काढण्यात येत असल्याचा महत्वपूर्ण निर्णय महाजन यांनी दिला असल्याची माहिती ऍड. शिंदे यांनी दिली.