राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २४ लाख रुपयांची बॅग पळवून नेणाऱ्या ५ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ओंकार दिनकर जाधव( वय- २४) अनिकेत गोरख उकांडे (वय- २३, रा. दोघेही अकोळनेर ता. नगर जि. अहमदनगर), किरण रामदास गदादे (वय -२३, रा. तांदळी, ता. शिरूर) तेजस मोहन दुर्गे (वय -२०, रा. म्हाडा कॉलनी, बारामती, ता. बारामती) गणेश बाळासो कोळेकर (वय- २० वर्षे रा. तावरे वस्ती सांगवी ता बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता. ०६ ) एक इसम खाजगी कंपनीचे कुरियर घेऊन पुणे कडे एस टी बस ने प्रवास करीत होता. सदर इसमावर काही लोकांनी पाळत ठेवत एस. टी. यवत येथे येताच २ संशयित इसम उठून सदरील कुरियर बॉयला तु मुलींना का छेडतो असे ओरडून त्याला मारहाण केली.
तसेच त्याच्याजवळ असलेली २४ लाख रुपयांची कुरियर ची बॅग घेऊन गेले. याबाबत सदर कुरियर बॉयने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा पथक करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. २४) वरील ५ आरोपी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा आणखी एक आरोपी प्रेमराज उत्तम ढमढेरे रा. तांदळी ता. शिरूर) याच्या मदतीने केला असल्याची माहिती दिली. त्यानुसार वरील ५ आरोपींना पुढील तपास कामी यवत पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरील कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, विजय कांचन, अजित भुजबळ, अजय घुले, राजू मोमीन, दत्तात्रय तांबे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, दगडू विरकर यांनी केली आहे.