पुणे : बारामतीसह इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या बारामती तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
विजय अशोक माने (वय-१९) प्रदिप रघूनाथ साठे (वय-२२, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा), प्रेम सुभाष इटकर, वय-१९ दोघे रा. मिलींदनगर, जामखेड, जि. अहमदनगर), संतोष तुकाराम गाडे (वय-४२, रा. अंमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील चौघांची नावे आहेत. सदर आरोपींकडून पोलिसांनी स्कुटी, पल्सर, स्पेलंडर अशा वेगवेगळ्या कंपनीच्या १३ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या २७ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यापासून बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगटे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमलदार राम कानगुडे, अमोल नरूटे, दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांना दिली होती.
सदर पथकाने पोलीस ठाणे अभिलेखावरील मोटारसायकल चोरी करणारे आरोपी तसेच बारामती शहर परिसरातील सी.सी.टि.व्ही कॅमेन्याचे फुटेज तपासून तांत्रिक माहिती वरून वरील चार संशयिताना ताब्यात घेतले. त्यांचायाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या २७ दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, सदर चोरी केलेल्या मोटारसायकली पैकी काही मोटारसायकली आरोपी यांनी पुरून ठेवल्या होत्या. त्याही हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. सदर अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी दरोडयाचा प्रयत्न, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १३ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या २७ दुचाकी जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लगुटे, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी केलेली आहे.