सागर जगदाळे
भिगवण : पुणे- सोलापूर महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत कंटेनर व चारचाकी यांच्यात झालेल्या भिषण अपघातात सोलापूर महसूल खात्यातील अव्वल करकुणाचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात बुधवारी (ता. २०) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ग्राफिक कंपनीच्या मटेरिअयल गेटच्या समोर झाला आहे.
उमेश श्रीकृष्ण वैदय (वय- ४७) असे अपघातात मृत्यू झालेल्या अव्वल कारकुणाचे नाव आहे. तर प्रफुल्ल रमेश शिरसागर (वय – ३९, रा. ए / 468 अदित्यनगर विजापुर रोड सोलापुर व राजकुमार श्रीपती वाघमारे असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी प्रफुल्ल रमेश शिरसागर (रा. सदर) यांनीकंटेनर चालकाच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर कंटेनर चालक कंटेनर सोडून पळून गेला आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर महसूल खात्यातील अव्वल कारकून उमेश वैद्य, सेवानिवृत्त नायब तहसीलदार राजकुमार वाघमारे व वाहनचालक प्रफुल्ल क्षिरसागर हे चारचाकी गाडीतून शासकीय कामानिमित्त सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने निघाले होते.
बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भादलवाडी गावचे हद्दीत बिल्ट कंपनीचे मटेरिअयल गेटचे समोर अज्ञात कंटेनर चालकाने ताब्यातील कंटेनर हा पुणे सोलापुर रोडने पुणे बाजुकडून सोलापुर बाजुकडे निघाला होता. यावेळी त्याने अचानक डिवायडरमधुन सोलापुर पुणे रोडवर घेतला. याचवेळी सोलापूर कडून पुण्याकडे आलेल्या कारने कंटेनरला जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रफुल्ल क्षिरसागर यांच्या डावे हाताचे मनगटाजवळ व छातीस गंभीर व किरकोळ दुखापती झाली. उमेश श्रीकृष्ण वैदय यांच्या डोक्याला व छातीला जबरदस्त मार लागला तर राजकुमार श्रीपती वाघमारे यांच्या डोक्यास व इतर ठिकाणी किरकोळ व गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, जखमी कारमधील तिघांनाही भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान उमेश श्रीकृष्ण वैदय यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर कंटेनर चालक कंटेनर सोडून पळून गेला आहे. अपघाताचा पुढील तपास सहाय्यक फौजदार वारगड हे करीत आहेत.