पुणे : व्यावसायिक प्रगती होत नसल्याने व मूळ बाळ होत नसल्याने अघोरी पूजा करून मृत माणसांची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके यांच्या हाडांची पावडर तसेच स्मशानभूमीतील राख आणून त्याची पूजा केल्यानंतर तीच राख पाण्यात मिसळून विवाहितेला पिण्यासाठी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धायरी येथून समोर आला आहे.
विवाहितेच्या सासरी धायरी येथे व निगडी या दोन ठिकाणी हा प्रकार २७ एप्रिल २०१९ पासून सुरु होता. फिर्यादीच्या तक्ररीनंतर सिंहगड रोड पोलिसांनी विवाहितेच्या ससारच्या लोकांवर विवाहितेचा छळ, नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा नियमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २८ विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीई कम्प्युटर शिक्षण झालेल्या फिर्यादीचा २७ एप्रिल २०१९ रोजी विवाह झाला होता. यावेळी ससारच्या लोकांच्या हट्टाने सासरच्या ४५ महिलांना चांदीची जोडावी देण्यास भाग पाडले. तसेच लग्नात ८० तोळे सोने, सेलेरिओ कार देण्याची मागणी केली. ती देखील पूर्ण करताना लग्न करून देण्यात आले. प्रत्येक सणाला विविध गोष्टींची मागणी सासरच्या लोकांकडून करण्यात येत होती. जावयाला सुमारे २५-३० तोळे तर फिर्यादीला ५०-५५ तोळे सोने देण्यात आले होते. तसेच जून २०२० मध्ये गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये देखील देण्यात आले होते.
विवाहितेच्या सासरचे लोक प्रत्येक आमावस्येला एकत्र जमून काळे कपडे घालून तळघरातील खोलीत काही तरी करत असत. कोरोनामुळे फिर्यादीच्या सासरची परिस्थती ढासळत चालली होती. त्यामुळे २२ मे रोजी त्यांनी अघोरी पूजा मांडली. टाचण्या टोचलेले लिंबू, बाहुल्या, मिरची, हळदी कुंकू असे साहित्य आणण्यात आले. फिर्यादीच्या जावेने एका महिलेला व्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉल लावून पूजा पूर्ण केली. यानंतर प्रत्येक अमावास्येला असे कृत्य केले जात होते.
मुलबाळ होत नाही म्हणून एका अमावस्येच्या दिवशी रात्री तिचे दीर, जाऊ, पतीसह सर्व जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले आणि तेथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली. तसेच राख मडक्यात घेतली. ते सर्व घरी आणून त्याची पूजा केली. त्यानंतर मडक्यातील राख पाण्यामध्ये मिक्स करुन ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले.
या प्रकारानंतर ११ फेबुवारी २०२१ रोजी जावेच्या निगडी येथील घरी पूजा करण्यात आली. त्यासाठी मृत माणसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय व कोंबड्याचे मुंडके हे सर्व जावेच्या आईवडिलांनी अगोदर आणले. होते. मांत्रिक महिलेने अघोरी पूजा केली. त्यानंतर हाडाची पावडर करुन ती फिर्यादींना खायला सांगितली.
त्याला फिर्यादीने नकार दिल्यावर जावेच्या वडिलांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर काढून ते तिच्या डोक्याला लावून जबरदस्तीने पावडर खाण्यास भाग पाडले. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार आणखी तीन चार वेळा झाला. त्यामुळे तिला मळमळ व उलट्या होऊ लागल्या. अंगावर रिअॅक्शन आली. तरीही तिच्या सासरकडील तिला दर अमावस्येला पूजा करायला लावत. ‘तु वांझोटी आहे, तुझ्यामुळे आमची आर्थिक प्रगती कमी झाली. तू पांढर्या पायाची आहे’, असे बोलून छळ करीत आहेत.
नंतर फेबु्वारी २०२१ मध्ये तिला सासरकडील लोकांनी जावेबरोबर तिच्या आईवडिलांच्या कोकणातील एका पुजेसाठी पाठविले होते. तेथे मध्यरात्री एका धबधब्याखाली आंघोळ करायला लावली. त्यावेळी तिच्या जावेने मांत्रिक महिलेशी व्हॉटसअॅप कॉलवर मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे जावेच्या आईवडिलांनी तिला अघोरी कृत्य करायला लावले.
हा प्रकार तिने पतीला सांगितला. तेव्हा त्याने आम्ही गुंड लोक आहोत, हे कोणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाचा मुडदा पाडू अशी धमकी दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये फिर्यादीच्या पतीला क्रेटा गाडी घेण्यासाठी तिच्या वडिलांनी ८ लाख रुपये दिले. तरीही ते अर्धा हिस्सा देण्याची मागणी करीत होते. हा अघोरी प्रकार सुरु होता.
मुलबाळ होत नाही व आई वडिलांनी पैसे देणे बंद केल्यामुळे फिर्यादी यांना २६ मे २०२२ रोजी घरातून हाकलून दिले. त्यानंतर माहेरी आल्यावर त्यांनी नांदण्यास जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला. पंरतु त्यांनी दाद न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन फिर्याद दिली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.