पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील दि. पश्चिम महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेत २०१४ साली पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने १ कोटी ७ लाख ५४ हजार रुपयांचा भ्रष्टाचार करून गाशा गुंडाळला होता. याप्रकरणी या संचालकांनी सादर केलेल्या माफीच्या अर्जाची चौकशी करून तो सहकार विभागाने नामंजूर केला आहे. त्यामुळे संचालकांकडून व्याजासह पैसे वसूल करून ठेवीदारांना द्यावेत असे आदेश सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांनी दिले आहेत. त्यामुळे पतसंस्थेच्या ठेवीदारांना पैसे मिळवण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांचगणी येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या दि. पश्चिम महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांचा कोट्यवधीचा घोटाळा २०१४ साली समोर आला होता. त्यानंतर या संस्थेला टाळे लागले. आणि ठेवीदार मात्र वाऱ्यावर पडले. ठेवीदारांनी आंदोलने करून संस्थापक व संचालकांना तगादा लावला परंतु काहीच झाले नाही.
हातगेघर (ता. जावली) येथील प्रकाश गोळे यांनी पुढे लागून ठेवीदारांच्या वतीने लढाई सुरू केली. सहाय्यक निबंधक, सहकारी निबंधक, सहकार आयुक्त, सहकार मंत्रालय अशा विविध ठिकाणी आवाज उठवत आपला रेटा पुढे चालू ठेवला. त्यानंतर चौकशी होत या संस्थेचा १ कोटी ७ लाख ५४ हजार रुपयांचा घोटाळा बाहेर निघाला. यावर काम झाल्यानंतर या वर २०१६ साली सदर जबाबदार संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून त्यावर बोजा चढविण्यात आला. परंतु त्यानंतर कसलीही कारवाई झाली नाही. मग यातील दोन संचालकांनी हायकोर्टात धाव घेवून विलंब माफीची मागणी केली परंतु हे अपील फेटाळण्यात आले.
त्यानंतर जप्त प्रॉपर्टी चा लिलाव करून सदर ठेवीदारांचे पैसे तातडीने द्यावेत असे आदेश असतानाही सहकार खाते शांतच आहे. परंतु पुन्हा एकदा गोळे यांनी यावर पाठपुरावा केला असता सदर भ्रष्टाचारीत रक्कम १ कोटी ७ लाख ५४ हजार रुपये आणि त्यावर १२ टक्के व्याजदराने ही रक्कम ठेवीदारांना देण्याची व्यवस्था करावी असा आदेश पारित केला. त्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, पाचगणी पोलीस ठाण्यात ही संस्थेने ६० लाखांची अफरातफर केल्याची तक्रार दाखल झाली होती. याची महाबळेश्वर कोर्टात केस चालू असून ती ही निकालाधिन आहे. तर तीन वर्ष झाले याबाबत ग्राहक न्यायालय सातारा येथेही तक्रार दाखल झाली असून आता जर ग्राहकमंच बरोबरच सहकार खात्याचे आदेश पाळून जर ठेवीदारांचे पैसे दिले नाही तर मात्र संबंधित संचालकांवर कारवाई होणार असल्याचे प्रकाश गोळे यानी सांगितले गोळे यांना बापू पवार आणि संजय भिलारे हे ही सहकार्य करीत आहेत.