पुणे : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहनवाडी येथील घरफोडी व जबरी चोरी करणारे दोन आरोपी येरवडा तपास पथकाने जेरबंद केले आहेत.
राघु राजु घोरपोट (वय-२४ रा. सध्या सणसवाडी ता. शिरुर, मुळ पत्ता चिखलठाणा ता. जि. औरंगाबाद), अमर रामलु वाहेदलोग (वय-२६ रा. येरवडा, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात मोहनवाडी येथील घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकाऱ्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दोन इसम त्यांचेकडे असलेले चोरीचे चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी गांधीनगर येरवडा येथे थांबलेले आहेत. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यांना नाव व पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे नाव व पत्ता सांगितले.
दरम्यान, त्यांचेकडे अंगझडतीत मिळालेल्या चांदीच्या वस्तूबाबत चौकशी करता त्यांनी येरवडा परिसरात चोरी केल्याचे कबूल करून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडे अधिक तपास करता त्यांनी ४ गुन्हे केल्याचे कबूल केले असून त्यांचेकडून चारही गुन्हयातील मिळून एकूण १ लाख ६८ हजार ६० रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलीस अमलदार गणपत चिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख कैलास डुकरे, सागर जगदाळे किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांनी केलेली आहे