पुणे: मोशी येथे एक वर्षापूर्वी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ कोटी ९ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने देताना लोकअदालतीत सुधीरकुमार बुक्के आणि ॲड. सुरेंद्र दातार यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हे एक खडकीतील आर्मी बेस वर्कशॉपमध्ये तांत्रिक होते. मोशीतील सरदार चौकातून ते १ सप्टेंबर २०२१ रोजी निघाले होते. तेव्हा रस्ता ओलांडत असताना त्यांना बसने धडक दिली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. याप्रकरणी त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई यांनी ॲड. अनिल पटणी आणि ॲड. आशिष पटणी यांच्यामार्फ मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला.
हा दावा बसमालक आणि विमा कंपनी असलेल्या गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात सत्र न्यायाधीश आणि मोटार अपघात न्याय – प्राधिकरणाचे सदस्य डी. पी. रागीट यांच्या न्यायालयात दाखल झाला होता. तडजोडीसाठी अर्जदाराचे वकील ॲड. अनिल पटणी आणि ॲड. आशिष पटणी, गो डिजिट जनरल इन्शुरसन्सचे अधिकारी सुखप्रीत सिंग आणि ॲड. सुनील द्रवीड यांनी महत्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, पादचारी व्यक्तीचे वय ४८ हे वर्षे होते. त्यांना दरमहा ८० हजार रुपये वेतन मिळत होते. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा विचार करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. दावा दाखल केल्यापासून एका वर्षात निकाली काढण्यात आलेला आहे. पक्षकारांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान असल्याचे ॲड. पटणी यांनी सांगितले.