सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना धोरणातील पाणीसाठा आज शुक्रवारी (दि.02 ऑगस्ट) सकाळी आठ वाजता 86.63 टीएमसी झाला आहे. सध्याच्या स्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या 40 हजार क्युसेकमध्ये वाढ करुन आज सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पायथा वीज गृहातून दोन हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रात 52 हजार 100 क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे कृष्णा- कोयना नदीकाठी पुन्हा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता कोयना धरणातून 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला. तो विसर्ग चार दिवस स्थिर ठेवण्यात आला होता. आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठी झाला आहे. धरणात 52 हजार 834 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
सध्या धरणातून 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून पायथा वीजगृहातून दोन हजार 100 क्युसेक असा 42 हजार 100 क्युसेक विसर्ग होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.