लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून कारने जात असताना, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. हा अपघात कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडी पाट टोलनाक्याजवळ गुरुवारी (ता.1) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात बारामतीतील तिघेजण जखमी झाले आहेत.
गणेश विठ्ठल जायपत्रे (वय 38), रणजित पोपट जाधव (वय 35) आणि शरद गुलाब खुडे (वय 40, सर्व रा. कोऱ्हाळे, ता.बारामती) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश जायपत्रे, रणजित जाधव व शरद खुडे हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बारामतीहून मांजरी येथे कारने चालले होते.
दरम्यान, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, लोणी काळभोर परिसरात पाऊस पडत होता. पावसामुळे पुढचे अंधुक दिसल्याने, त्यांची कार कवडी पाट टोलनाक्याजवळील रस्ता दुभाजकाला धडकली. या अपघातात कार मधील तिघेही गंभीर जखमी झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत खोसे, पोलीस अंमलदार मनोहर गोरवे, बिभीषण कुंटेवाड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गणेश जायपत्रे यांच्या डोक्याला मार लागला आहे. रणजित जाधव यांचा हात फॅक्चर झाला आहे. तर शरद खुडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. तिघांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.