नवी दिल्ली: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अंमलबजावणी संचालनालयाबाबत (ईडी) मोठा दावा केला आहे. ईडी त्यांच्या घरावर छापा टाकू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. राहुल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, माझ्या घरावर छापा टाकण्याची योजना ईडीकडून आखली जात असल्याची माहिती ईडीमधीलच काही लोकांनी मला दिली आहे. माझे चक्रव्यूहचे भाषण त्यांना आवडले नाही असे दिसते. मी ईडीचे स्वागत करण्यास तयार आहे, तेही चहा आणि बिस्किटांनी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
खरे तर पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले की, देश भाजपच्या चक्रव्यूहात अडकला आहे. देशात भीतीचे वातावरण आहे. देशातील तरुण आणि शेतकरी सगळेच घाबरले आहेत. हिंसा आणि द्वेष हा भारताचा स्वभाव नाही. चक्रव्यूहात भय आणि हिंसा आहे.
’21 व्या शतकात एक नवीन चक्रव्यूह निर्माण झाला आहे’
राहुल पुढे म्हणाले की, 21 व्या शतकात नवीन चक्रव्यूह तयार झाला आहे. हा चक्रव्यूह कमळाच्या आकारात आहे. या चक्रव्यूहात सहा जणांचा सहभाग आहे. यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा समावेश आहे. ज्यांनी चक्रव्यूह निर्माण केला, त्यांचा गैरसमज आहे. देशातील तरुण आणि मागासलेले लोक अभिमन्यू आहेत, असे त्यांना वाटते. पण ते अभिमन्यू नाहीत, तर अर्जुन आहेत, जो तुमचे चक्रव्यूह तोडून तुम्हाला फेकून देईल.
राहुल म्हणाले की, दोन लोकांना देशाच्या संपूर्ण संपत्तीचे मालक बनवले आहे. अर्थव्यवस्था वाईट आहे, पण मित्र श्रीमंत आहेत. पंतप्रधान मोदींनी भारतातील मध्यमवर्गाचा विश्वासघात केला आहे. मोदी सरकारने लष्कराच्या जवानांना अग्निवीरच्या चक्रव्यूहात अडकवले आहे. अग्निवीर जवानांच्या पेन्शनसाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही. तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणता, पण जेव्हा अग्निवीर दलाला मदत करायची आणि सैनिकांना पैसे देण्याची वेळ येते, तेव्हा तुम्हाला बजेटमध्ये एक रुपयाही दिसत नाही.
सर्वसामान्य भारतीयांचे ‘रिकामे खिसे’ कापले जात आहेत
राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या अमृतकाळात सर्वसामान्य भारतीयांचे ‘रिकामे खिसे’ही कापले जात आहेत. ज्या सरकारने उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ केले होते, त्या सरकारने 8500 कोटी रुपये गरीब भारतीयांकडून वसूल केले आहेत, ज्यांना ‘किमान शिल्लक’ देखील राखता येत नाही.
Apparently, 2 in 1 didn’t like my Chakravyuh speech. ED ‘insiders’ tell me a raid is being planned.
Waiting with open arms @dir_ed…..Chai and biscuits on me.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 1, 2024
‘पेनल्टी मेकॅनिझम’ हे मोदींच्या चक्रव्यूहाचे द्वार आहे. ज्याद्वारे सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण लक्षात ठेवा, भारतातील लोक अभिमन्यू नसून अर्जुन आहेत, चक्रव्यूह मोडून तुमच्या प्रत्येक अत्याचाराला उत्तर कसे द्यायचे हे त्यांना माहीत आहे, असे देखील राहुल गांधी यांनी म्हटले आहे.