ठाणे : या महाष्ट्राला झालं तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसापूर्वीच अमोल मिटकरी यांची गाडी मनसेकडून फोडण्यात आली होती. आता खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.
सीएसटीएम कडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला..
जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना 3 ते 4 हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याच्या दिशेने आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने म्हणणे आहे. आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेने केली होती.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विरुद्ध विचार..
मी घराकडे जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज आला. गाडी थांबवायला सांगितली, त्यानंतर हा हल्ला झाला. संभाजी राजेंची चूक होती. विशाळगडावर जे काही झालं, ते त्यांच्या आडून झालं. त्यावेळी त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती. हे मी आज देखील सांगत आहे. राजर्षी शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारांचं रक्त होतं. त्यांचं भांडण लावणारं रक्त नव्हतं. शाहू महाराजांचा विचार एक टक्का देखील संभाजीराजेंमध्ये दिसत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.