मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड हे बऱ्याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते आणि त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. एकेकाळी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजांचा धैर्याने सामना करणारा हा दिग्गज फलंदाज जीवनाची लढाई हरला. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी अंशुमन गायकवाड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि भारतीय क्रिकेटसाठी हा धक्का असल्याचे म्हटले.
1970-80 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेल्या अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार सुरू होते. माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी बीसीसीआयकडे त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. यानंतर 14 जुलै रोजी बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी 1 कोटी रुपयांची घोषणा केली होती.
गायकवाड यांची कारकीर्द
23 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईत जन्मलेल्या अंशुमन गायकवाड यांनी 1974 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले. यानंतर, 1985 पर्यंत त्यांनी भारतासाठी 40 कसोटी सामने आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. गायकवाड यांनी या 40 कसोटी सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 1985 धावा केल्या, यामध्ये 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 201 ही त्यांची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती. पाकिस्तानविरुद्धच्या जालंधर कसोटीत त्यांनी 201 धावांची इनिंग खेळली होती. त्यांनी 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 धावा केल्या होत्या. अंशुमन हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याकडून खेळत असे. 206 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 41 च्या सरासरीने 12136 धावा केल्या.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी टीम इंडियाच्या कोचिंगची जबाबदारीही स्वीकारली. 1998 मध्ये ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनले आणि 2000 पर्यंत या पदावर राहिले. अनिल कुंबळेने त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानविरुद्धच्या दिल्ली कसोटीच्या एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या होत्या. तर शारजाहमध्ये सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन गोलंदाजी मोडून काढत भारताला मालिका जिंकून दिली होती.