पिंपरी (पुणे): ‘धान्य फुकट मिळत आहे, त्यामुळे तुमचे दागिने काढून ठेवा,’ अशी बतावणी करत चोरट्याने महिलेचे दागिने हातचलाखी करीत चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी एक वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे घडली.
सत्यभामा प्रदीप आढाव (वय ५८, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास फिर्यादी या आळंदी रोड, भोसरी येथून पायी चालल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी सत्यभामा यांना फुकट धान्य मिळते असे सांगून फिर्यादी महिलेला विश्वासात घेऊन त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत व कानातील सोन्याचे कर्णफुले काढण्यास सांगितले. तसेच ते फिर्यादीच्या जवळील पाकिटात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर हातचालखी करून सत्यभामा यांची ७ ग्रॅम वजनाची २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व १ ग्रॅम वजनाची दोन हजार रुपये किमतीची कर्णफुले असा एकूण ८ ग्रॅम वजनाचे २२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.