नवी मुंबई : उरण हत्याकांडाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदें या मुलीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक मोठी माहिती समोर आली आहे. यशश्री शिंदेंच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे. दाऊद शेखच्या नावाने यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
पोलिस आता या टॅटू आर्टिस्टच्या शोधात आहेत. हे टॅटू संमतीने काढण्यात आले होते की जबरदस्तीने याचा शोध घेतला जाणार आहेत. उरणमधील यशश्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचं त्याच्या जबाबातून उघड झालं आहे.
मृत यशश्रीच्या अंगावर दोन टॅटू..
पोलीस सूत्रांनी सांगितले की, पोस्टमॉर्टमच्या दरम्यान मृत यशश्री शिंदे हिच्या शरीरावर दोन टॅटू दिसून आले आहेत. मृत यशश्री शिंदे हिच्या अंगावर दोन टॅटू सापडले असून त्यावर तिने आरोपी दाऊद शेखचे नाव कोरलं असल्याचं समोर आलं आहे. मृताने यशश्रीच्या अंगावर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हा टॅटू काढला होता आणि हा टॅटू काढताना दाऊद शेखही यावेळी उपस्थित होता असेही सूत्रांनी सांगितले.
दाऊद शेखने यशश्रीला टॅटू काढण्यास भाग पाडले का? तसेच तिच्या संमतीने हे सर्व केले गेले का? या प्रश्नांचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. पोलिस या टॅटू आर्टिस्टचा शोध घेत असून त्याचा जबाब नोंदवणार आहेत जेणेकरून टॅटूशी संबंधित माहितीची पडताळणी करता येईल.
यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात उरण पोलिसांना खालील मुद्द्यांच्या तपासासाठी दाऊद शेखची रिमांड हवी आहे, यशश्रीच्या शरिरावर जे रक्ताचे डाग आणि खुणा सापडल्या आहेत त्यांच्याशी दाऊदचा डीएनए तपासणं आवश्यक आहे. 2019 मधील पॉक्सो केस प्रकरणाचा सूड घेणं हाच एक हेतू यशश्रीच्या हत्येमागे होता, की दाऊदचा अन्य काही हेतू होता? याचाही तपास सुरू आहे.