पुणे : मावस भावाच्या बायकोचे चारचाकी गाडीमध्ये हातपाय बांधून अपहरण करून एका खोलीमध्ये नेऊन वारंवार जबरदस्तीने बलात्कार करण्याचे आरोप असलेल्या आरोपीची पुणे जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. पी. जाधव यांनी 30 जुलै रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. बिरप्पा खेत्री बंदीछोडे असे निर्दोष मुक्तता झालेल्याचे नाव आहे.
प्रकरणाची सविस्तर माहिती अशी कि, जुलै २०१७ मध्ये पीडिता, लहान मुलगा व पतीसह पुण्यात कोंढवा परिसरात भाड्याच्या खोलीत राहायला आली होती. बिरप्पा खेत्री हा पीडितेचा मावसदिर त्यांच्या घरी जेवणासाठी येत असे. २०१७ मध्ये एके दिवशी बिरप्पा खेत्रीने एका चारचाकी गाडीत पीडितेला बसवून काही अंतरावर तिचे हातपाय बांधून व तोंड कापडाने बांधून तिचे अपहरण केले व एका खोलीत घेऊन गेला होता. सदर खोलीत आरोपीने “तूझ्या नवऱ्याने माझ्याकडुन पैसे घेतले आहेत जोपर्यंत तो पैसे देत नाही तोपर्यंत तू माझ्याबरोबर राहायचे नाहीतर तूझ्या मुलाला खलास करून टाकीन” अशी धमकी देऊन वारंवार पीडितेवर जबरदस्ती शाररिक संबंध ठेवले होते.
पीडिता आरोपीसोबत राहत असताना आरोपीने त्याच्या मित्राला बोलवून त्यानेही पिडीतेसोबत जबरदस्तीने शाररिक संबंध केले. त्यानंतर एकेदिवशी आरोपी दारू पिऊन घरी आला तेव्हा त्याने दरवाज्याला आतून कुलूप लावले नव्हते त्याचा फायदा घेऊन पीडिता आरोपीच्या तावडीतून निघून आली होती. नंतर पीडितेने मंदृप पोलीस ठाणे, सोलापूर येथे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हा सदर गुन्ह्याचा तपास पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता.
या प्रकरणात पिडीतेसह एकूण ३ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती. आरोपीतर्फे लोकअभिरक्षक कार्यालयाचे (LADCS)ॲड. मयुर दोडके यांनी पिडितेची उलट तपासणी घेतली. पीडितेच्या उलटतपासणीमध्ये समोर आलेल्या गोष्टी लक्षात घेऊन सदर प्रकरणात पिडीतेची शाररिक संबधास सहमती असल्याचे व पीडितेला पळून जाण्यासाठी पूर्ण संधी असतानाही तिने आरोपीसोबत स्वेच्छेने राहणे पसंत केले असल्याचे उघड झाले. न्यायालयाने या सर्व बाबी निकालात नोंदवत आरोप असणाऱ्या बिरप्पा खेत्री बंदीछोडे याची निर्दोष मुक्तता केली.