कोल्हापूर: मित्रांमध्ये दुचाकी उभी करण्यावरून वाद झाला. या वेळी एकमेकांना शिवीगाळ झाली. तिघांनी अमोल भारत जानराव (वय ३२ रा. कात्यायनी कॉप्लेक्स, कळंबा) याला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ओढ्यात ढकलून दिले. या प्रकरणी मित्राच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास रामानंदनगर येथील ओढ्याजवळ काही तरुण बोलत थांबले होते. त्यांनी मद्यप्राशन केले होते. दुचाकी उभी करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. अमोल जानराव याला तीन ते चार तरुणांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाने
रस्त्यावरील दगड उचलून अमोलच्या डोक्यात घातला. अमोलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिघांपुढे त्याचा निभाव लागला नाही. हल्लेखोरांनी अमोलला खाली ढकलून दिल्यामुळे तो खाली पडला. त्याच्या हालचाली बंद झाल्यामुळे तो मृत झाला असावा असा समज करून हल्लेखोर तेथून पळून गेले.
अमोलच्या मित्रांनी त्याला कारमधून तातडीने सीपीओर रुग्णालयात दाखल केले. रामानंदनगरात ओढ्याजवळ तरुणाचा खून झाल्याची अफवा सोशल मिडीयावरून संपूर्ण शहरात पसरली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व त्यांचे पथक तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी जखमीची विचारपूस केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोराची धरपकड सुरू केली.
पूर्ववैमनस्यातून हल्ला
अमोल जानराव याच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा पूर्ववैमनस्यातून असल्याचे समजते. अमोल हा मावा विक्री करत असल्याचे समजते. हल्ला करणारे त्याचे मित्रच असून आर्थिक वादातून त्यांच्यात भांडण झाल्याचा संशय आहे.
जखमी म्हणतो तलवार मारली
पोलिसांनी जखमी अमोल याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तो माझ्यावर तलवार हल्ला झाला असे म्हणत होता. डोक्यात झालेल्या जखमा या तलवारीच्या नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमका काय प्रकार घडला आहे. याची पोलीस चौकशी करीत आहेत.