उरुळी कांचन, (पुणे) : कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या मोक्काच्या आरोपाखाली कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपी दोन सख्ख्या भावांना पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायधीश व्ही. आर. कचरे यांच्या कोर्टाने अटी व शर्थींवर जामीन देण्याचे आदेश पारित केले आहेत, अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. विजेंद्र बडेकर यांनी दिली.
सनी राजू चव्हाण व अनिश राजू चव्हाण अशी जामीन झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात सनी राजू चव्हाण व अनिश राजू चव्हाण यांच्यावर कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान गुन्हेगारी संघटना नियंत्रक कायदा (मोक्का) कायद्याचे कलम लावले होते.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. विजेंद्र बडेकर यांनी युक्तिवाद केला. “या आरोपींनी कोणत्याही घातक शस्त्राने हल्ला केलेला नाही. फक्त बुक्या आणि लाथांनीच मारहाण केली आहे, त्यामुळे आयपीसीच्या कलम 307 अंतर्गत त्यांच्यावर गंभीर आरोप ठरत नाहीत. तसेच सनी चव्हाणवर कोणताही पूर्वीचा गुन्हा नाही आणि अनिश चव्हाण वरील एकमेव गुन्हा 12 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे (मोक्का) कलमही या प्रकरणात लागू होत नाही.”
ॲड. विजेंद्र बडेकर याच्या युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष मोक्का न्यायाधीश व्ही.आर. कचरे न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. नमूद केले की, “या आरोपींनी फक्त बुक्या आणि लाथांनी मारहाण केली असून, त्यांच्यावर आयपीसीच्या कलम 307 अंतर्गत आरोप फारच कमकुवत आहेत. तसेच, आरोपींवर कोणतेही पूर्व गुन्हे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्याची गरज नाही.”
दरम्यान, आरोपी पक्ष व सरकार पक्षांचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील विशेष न्यायधीश व्ही. आर. कचरे यांच्या कोर्टाने आरोपीस जामिनावर सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. विजेंद्र बडेकर यांनी दिली. या कामी ॲड. सिध्दार्थ बाने, ॲड. आशिष सुराणा, ॲड. तेजस सावंत, ॲड. चांदनी भोजवाणी यांनी मदत केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोंढवा गुन्ह्यात नवीन वळण आले आहे.