उरुळी कांचन, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील नायगाव -पेठ (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक कंपनीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. 29) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये ही घटना घडली आहे.
संदीप बबन सोनवणे (वय-39, मुक्काम पोस्ट, अल्ट्राटेक, पेठ नायगाव ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सचिन उत्तम मोरे (वय – 43, व्यवसाय नोकरी, राहणार गणलक्ष्मी कॉलनी, आकुर्डी रोड, चिखली, पिंपरी चिंचवड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बबन सोनवणे हे सोमवारी कामावर आले होते. तसेच कंपनीतील सचिन मोरे हे काम करीत असताना त्यांना दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास काम करणारे विद्यावंत मोरे यांनी सांगितले की, आपल्याकडे बॉय म्हणून काम करणारा संदीप बबन सोनवणे हा कॅन्टींगमध्ये निपचित खाली पडलेला आहे.
दरम्यान, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोरे हे कॅन्टीनमध्ये गेले असता संदीप सोनवणे हे खाली जमिनीवर निपचित पडलेले दिसले. त्यांना तात्काळ खासगी गाडीने उरुळी कांचन येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीड महिन्यापूर्वी फुरसुंगी येथील कामगाराचा मृत्यू
दीड महिन्यापूर्वी फुरसुंगी येथील कामगार अनिल महादेव पन्हाळकर (वय- 52, रा.पांडवदंड, फुरसुंगी पुणे) यांचा अल्ट्राटेक कंपनीत चक्कर येऊन पडल्याने 15 जूनला मृत्यू झाला होता. याप्रकरणीही उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती.