पुणे : राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी महिलांना आपला अर्ज दाखल केला आहे. राज्य सरकारकडून 19 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत. विविध माध्यमांतून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना आवाहन केलं जात आहे. मात्र, अशाप्रकारे महिलांना लाडकी बहीण योजनेचं आवाहन करणं भाजप आमदाराला चांगलच भोवल आहे. या बॅनरवरुन महिलांनी थेट आमदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसघात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या बॅनरवर सहमती न घेता फोटो लावल्याचा आरोप बॅनरवर फोटो झळकलेल्या महिलांनी केला आहे. पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचाही फोटो आहे. मात्र, या नेत्यांच्या फोटोसह या दोन महिलांचे फोटो देखील बॅनरवर लावले आहेत.
या बॅनरवर झळकलेल्या महिलांपैकी एकीचं नाव नम्रता अंकुश कावळे तर दुसरीचं नाव भागीरथी माणिक कुरणे असं आहे. या दोन्ही महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. त्यामुळे संमतीशिवाय योजनेच्या जाहिरातीवर आपले फोटो लावल्याने महिलांना थेट पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे.
आमदाराकडून दिलगिरी व्यक्त..
दरम्यान, कोणालाही दुखवण्याची आमची भावना नाही. ही योजना महिलांसाठी आहे, आमचा हेतू वाईट नाही, योगायोगाने हा फोटो त्या बॅनरवर आला आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी भावना आमदार शिरोळे यांनी या पोलीस तक्रारीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.