पुणे: सदाशिव पेठमधील पुना हॉस्पिटल येथील पुलावरून एक मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची घटना समोर आली आहे. आज सोमवारी (दि. २९) सव्वा पाच वाजता ही घटना घडली. हा मुलगा अंदाजे बारा वर्षांचा असल्याची माहिती मिळत आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाकडून दोन पथके रवाना करण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे.
रविवारी संध्याकाळपासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पुणे शहरातील मुठा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. यामुळे पुण्या शहरातील भिडे पूल सोमवारी सकाळपासूनच पाण्याखाली गेला आहे. त्याचा पुण्यातील वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.
नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नेमकी त्याचदरम्यान पुना हॉस्पिटलच्या पुलावरून १२ वर्षाचा मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची घटना घडली आहे. मुलगा पाण्यात पडल्याचे समजताच अग्निशामक दलाने शोध कार्य सुरू केले आहे.