Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांनी जोरदार तयरी सुरु केली आहे. राजकीय नेते एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यातच आता उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार परत राष्ट्रवादीत आले तर त्यांना घेऊ नये. त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे म्हणत धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
उत्तम जानकरांचा अजित पवारांवर हल्लाबोल
सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अनेक आमदार घरवापसी करत असल्याचे दिसत असताना अजित पवारांची हालचाल तशी दिसून येत आहे का? असे विचारले असता उत्तम जानकर म्हणाले की, चर्चा तर सुरूच आहे. पण माझं मत आहे की, या राज्याला जेव्हा जाग लागली. तेव्हा हा बिबट्या पळून गेला आणि आता जंगलाची आग मतरूपी पाऊस पडून मतदारांनी विजवली आहे. अशा परिस्थितीत हा बिबट्या पुन्हा शिकारीसाठी माघारी आला तर इथला राष्ट्रवादीचा सच्चा सैनिक बिथरेल. त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे जानकरांनी यावेळी म्हटले.
आरक्षणावर औषध पवार साहेबांकडे..
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत विचारले असता उत्तम जानकर म्हणाले की, या प्रकरणाचे औषध जर कोणाकडे असेल तर ते निश्चित शरद पवार साहेबांकडेच आहे. सरकारला वाटत होतं की, आम्ही सगळ्यांनाच खेळत ठेऊ. मराठ्यांचा आणि ओबीसींचा राजकीय फायदा करून घेऊ. मात्र, आता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह नेत्यांनाही वाटत आहे की, मराठा आणि ओबीसी आरक्षणावर पवार साहेबच तोडगा काढू शकतात, असे त्यांनी म्हटले.
लाडकी खुर्ची योजना..
लाडकी बहीण योजनेबद्दल विचारले असता उत्तम जानकर म्हणाले की, यापुढे सरकार चालवता येऊ नये अशा पद्धतीचे धोरण या दोन महिन्यात राबवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. ही लाडकी बहीण योजना नसून, लाडकी खुर्ची योजना असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये असल्याचे सांगत उत्तम जानकर यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला टोला लगावला आहे.