कोल्हापूर : जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर गुन्ह्यांच्या तुलनेत या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. चोरांचा सुळसुळाट इतका वाढलेला पाहायला मिळत आहे की, आता या चोरट्यांनी पोलीस मुख्यालयाच्या पार्किंगला सुद्धा लक्ष्य केले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूर पोलीस मुख्यालयातून समोर आला आहे.
कोल्हापुर येथील पोलीस मुख्यालयातून एका पोलीस कर्मचार्याचीच दुचाकी चोरट्यांनी पळवली आहे. ही घटना गुरूवारी भर दुपारी घडली आहे. कॉंन्स्टेबल सुभाष गवळी यांची ही गाडी चोरीला गेली आहे. या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शाहूपुरी पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वाढती गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना आपण नेहमी ऐकत आणि वाचत असतो. मात्र या चोरट्यांचे धाडस इतके वाढले आहे. चोरट्यांनी पोलीस मुख्यालयाच्या पार्किंगला सुद्धा लक्ष्य केले असून तेथूनच एक दुचाकी चोरुन दुचाकी चोरट्यांने पोलीसांनाच आव्हान दिले आहे.
दरम्यान, पोलीस मुख्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही असून देखील चोरट्याने पोलीसांच्या पार्किंगमध्ये दुचाकी चोरण्याचे धाडस केले आहे.