पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचा भाग म्हणून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत कशा बैठका केल्या, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करत होतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. यावरून आता आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये 10 बैठका झाल्या होत्या. या बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जात असे. मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो, असे वक्तव्य केले. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
दादांनी टोपी घातली असावी. पण,..
अजित पवारांच्या विधानावर रोहित पवार म्हणाले की, अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून आम्हाला माहीत होते. आत्ताचे भाजपसोबत गेलेले अजित दादा यांना सर्व गोष्टी विचाराव्या लागतात. एखादी सही केल्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याकडे त्यांची फाईल जाते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाते. दादांनी टोपी घातली असावी. पण, आपण लोकसभेमध्ये बघितलं तर स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीला टोपी घातली आहे, असा खोचक टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे.
बारामतीत आमच्याकडून चांगली लढत होईल..
बारामतीत विधानसभा निवडणुकीसाठी कुठला उमेदवार देणार याबाबत विचारले असता, रोहित पवार म्हणाले की, बारामतीत योग्य असा उमेदवार देऊ, राजनीतीचा तो भाग आहे. पुढील वीस दिवसात समजेल की तिथे उमेदवार कोण असेल, उमेदवार जो कोणी असेल, योग्य उमेदवार तिथे दिला जाईल. तिथे खूप चांगली लढत आमच्याकडून होईल, असेही ते म्हणाले.