पुणे : अजित पवार यांना धक्के वर धक्के बसताना दिसत आहे. कालच अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अशातच आता पुण्यातील एका कार्यक्रमाला अजित पवारांच्या आमदाराने उपस्थिती लावल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्यात सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन ज्युबली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे एकाच व्यासपीठावर दिसून आले. शरद पवारांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच चेतन तुपे पवारांसोबत व्यासपीठावर दिसून आले आहेत. सातारा जिल्हा मित्र मंडळाचा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडी येथे पार पडला. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होते.
दरम्यान, एक दिवसापूर्वीच बाबाजानी दुर्रानी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार आणि राजेश टोपे यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला होता. बाबाजानी दुर्रानी हे कधी शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. मात्र, त्यांनी स्थानिक मुद्द्यावरून ऑक्टोबर २०२३ मध्ये अजित पवार यांच्यासोबतगेले होते.