संतोष पवार
पळसदेव : उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावाला गौरवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. हजारों पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरलेल्या आणि प्राचीन समृद्ध रेखीव कलाकुसर कोरिवचित्र शिल्पाने आपल्या वैभवसंपन्न इतिहासाची साक्ष देणारे प्राचीनकालीन पळसनाथ मंदिर सुमारे चार ते पाच महिने पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. सहाजिकच पळसदेवच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारों भाविकांना प्राचीन पळसनाथ मंदिर पाहण्याचे भाग्य लाभले होते.
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असणारे प्राचीन हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिर २४ वर्षांनंतर सन २००२ मध्ये प्रथमच पूर्णपणे उघडे पडले होते. यानंतर २०१३, २०१७, २०२३ मध्ये मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. धरणनिर्मिती झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात यंदा मार्च महिन्यात पाचव्यांदा मंदिर पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आले होते.
उजनी धरणामध्ये संपादित होण्याच्या अगोदर जुन्या पळसदेव गावामध्ये असणारी बाजारपेठ आणि इथल्या लोकांचा प्रधान असणारा कृषी व्यवसाय यावरून गावाला आर्थिक सुबत्ता व संपन्नता लाभली असल्याचे दिसून येते. भीमा नदीच्या तीरावर वसलेले आणि प्राचीन अख्यायिका असलेल्या पळसदेव गावातील प्राचीन हेमाडपंथी पळसनाथ मंदिराचे मजबूत बांधकाम, अप्रतिम कलाकुसर गाभाऱ्यातील कोरीव शिल्पकला सुबद्ध मांडणी असणारा सभामंडप दगडी खांब आदि वैशिष्ट्ये तत्कालीन समृद्ध स्थापत्य शैलीची साक्ष देणारे आहेत.
पळसदेव गावचे पुर्नवसन झाल्यानंतर ग्रामस्थांनी नवीन गावात पळसनाथाचे मंदिर बांधले. प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची नवीन मंदिरात स्थापना केली. त्याच बरोबर काही प्राचीन मुर्तीही नवीन गावात आणल्या. पळसनाथाचा यात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. उजनी धरणाच्या विस्तीर्ण जलाशयामध्ये पुनश्च एकदा प्राचीन हेमाडपंथी मंदिर आता गडप होऊ लागले आहे.