पुरंदर : पुरंदर तालुक्यातील विविध प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम सभेच्या दिवशी पुरंदर हवेलीतील विविध प्रश्नाबाबत बैठक आयोजित केली होती. राज्यात कोणत्याही भागात ग्रामसभा, आमसभा जारी केली असेल तर कोणत्याही शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात येत नाही. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन माजी राज्यमंत्री यांच्या सांगण्यावरून आयोजन केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विशेष अधिकार भंगाची नोटीस आमदार संजय जगताप यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहे.
सासवड तालुका पुरंदर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार संजय जगताप बोलत होते. आमसभा आयोजित केली असता त्या मतदार संघाबाबत इतर कोणत्याही शासकीय बैठकीचे आयोजन करू नये, अशी परंपरा आहे. परंतु माजी राज्यमंत्री यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक उल्लंघन करण्याचा प्रकार या माध्यमातून केला आहे. ही बाब संसदीय लोकशाहीसाठी पूर्णपणे घातक असून, स्थानिक जनतेतून निवडून आलेल्या विधानसभा सदस्याचा व विधानसभेच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान करणारी ठरते. त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो.
पुरंदर विधानसभा क्षेत्राचे आमसभा झाल्यानंतर बैठक घ्यावी. असेही आमदार यांनी सांगितले होते. परंतु तसे मुख्यमंत्री यांनी केले नाही. हा तर एक प्रकारचा लोकशाहीचा खून आहे. असेही जगताप यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पुरंदरच्या जनतेची माफी मागावी. या आमसभेत मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसांचे प्रश्न सुटावेत यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांचे ठराव करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अधिकारी या प्रश्नाचा निपटारा करतील अशी खात्री यावेळी आमदारांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी पुरंदरच्या जनतेची माफी मागण्याचा मुद्दा आमदार संजय जगताप यांनी चांगलाच लावून धरला आहे. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आमदार संजय जगताप यांनी सडेतोड पद्धतीने उत्तरं दिले. पुरंदरमधील सामान्य शेतकऱ्यांचे प्रस्ताव आलेले आहेत असे संजय जगताप यांनी सांगितले. गुंजवणी धरणाच्या संदर्भात, विमानतळाच्या संदर्भात या भागाच्या संदर्भातल्या पाणी, आरोग्य, रस्ते, अशा विविध प्रश्नावर आमदार संजय जगताप यांनी उत्तरं दिली.