पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला असताना पुणे शहर परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाकडून आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुसळदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात पुढील काही तास महत्वाचे असणार आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या सखल भागात पाणी साचून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून अनेकांचे संसार पाण्यावर तरंगू लागले आहेत. एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता शहरातील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालये वगळता इतरांनी कामकाज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्रासह घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, पुढील 24 तासांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
अजित पवार पुण्याकडे रवाना
मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी..
खडकवासला धरणातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग कमी करुन पंधरा हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र हे पाणी कमी होणं तात्पुरतं ठरु शकतं. कारण पावसाचा जोर पाहता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे या वेळेचा उपयोग करून सखल भागातील लोकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी येण्याची गरज आहे.
‘या’ भागात पर्यटकांना बंदी…
मावळ तालुक्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले आता ओसंडून वाहू लागले आहेत. तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पाणी साकव पुलापर्यंत आले आहे. कुंडमळा परिसरात असणाऱ्या कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. कुंडमळा परीसरात वर्षाविहार करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र कुंडमळा येथे पाण्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांना येथे बंदी घालण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.