(अजित जगताप)
सातारा : छत्रपती शिवरायांच्या राजधानीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्राहलयास कचरा आणि घाणीने अवकळा प्राप्त झाली होती.
महाराजांच्या वंशजांकडे सारी सत्ता एकवटली असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी प्रशासनाचा निषेध नोंदविताना छत्रपती शिवाजी संग्राहलयाची तातडीने येसुबाई फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छताही करून घेतली. याबाबत वस्तुसंग्राहालयाचे प्रमुख प्रविण शिंदे यांनी सुहास राजेशिर्के यांचे आभार मानले.
याबाबत माहिती अशी की, सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. येथे देशविदेशातून पर्यटक येतात. छत्रपती शिवरायाच्या इतिहासाची साक्ष देणारी ही नगरी आहे. या नगरीत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय काही वर्षापूर्वी उभारण्यात आले होते.
कोरोना महामारीच्या काळात या नव्याकोऱ्या वास्तू मध्ये जम्बो कोव्हिड सेंटर जिल्हा प्रशासनाने चालवले होते. मात्र, कोव्हिड आटोक्यात आणण्यासाठी व उपचारासाठी मदत करणाऱ्या या वास्तूकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.
आरोग्य सेवा देणाऱ्या विभागानेही कानाडोळा केला होता. सातारा बसस्थानक शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही वास्तू असूनही त्याची निगा राखली जात नव्हती. वास्तविक या जम्बो कोव्हिड सेंटरमुळे अनेकांचे प्राणही वाचले.
मात्र सेंटर बंद झाल्यानंतर ही वास्तू पुन्हा आहे तशी छत्रपती शिवाजी महाराज संग्राहलयाच्या यंत्रणेकडे द्यायला हवी होती. मात्र तसे न होता या वास्तूकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. निष्काळजीपणा दाखवत छ. शिवरायांच्या नावाचे पावित्र्य जपले नाही.
गाफील राहून या वास्तूला अवकळा कशी येईल? हेच पाहिले. वैद्यकिय कचरा, इतर साहित्य, प्लॅस्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या अस्तावस्त्य सोडून जिल्हा प्रशासनाने निष्काळजीपणा दाखवला होता. खरंतर, ही वास्तू छत्रपती शिवाजी महाराज संग्राहालयाच्या यंत्रणेच्या ताब्यात देताना जिल्हा प्रशासनाने वास्तूची निगा राखून रंगरंगोटी करून पुन्हा चांगल्या अवस्थेत देणे क्रमप्राप्त होते.
यामुळे छत्रपती शिवरायांच्या वास्तुसंग्रहालयाचे पावित्र्य जपले गेले नाही. म्हणून याला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही सुहास राजेशिर्के यांनी केली.नुसती मागणी करून राजकारण करण्यापेक्षा त्या वास्तू मध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबविण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे या वास्तूला नव्याने झळाळी मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. साताऱ्यात त्यांचे नाव घेऊन काही व्यक्ती संस्था व घर चालवत असल्या तरी छत्रपती शिवराय यांच्या नावाच्या संग्रहालयाकडे भेट देऊन त्याची काळजी घ्यावी असे कोणालाही वाटले नाही.
पण, राजघराण्यातील व्यक्ती व छत्रपती खासदर उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुहास राजेशिर्के यांनी स्वखर्चाने या वास्तूची स्वच्छता केली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल अनेकांनी धन्यवाद दिले आहेत.