पुणे प्राईम न्यूज डेस्क: 13 ऑगस्ट 2004 रोजी महाराष्ट्रातील नागपूर शहरातील जिल्हा न्यायालयात नेहमीप्रमाणे सुनावणी सुरू होती. यादरम्यान कोर्टात अशी घटना घडते की, जी पाहून सगळेच हैराण झाले. ही घटना म्हणजे कुख्यात सीरियल रेपिस्ट आणि किलर अक्कू यादवच्या हत्या. हा खून त्याला बळी पडलेल्या महिलांनीच केला होता.
नागपूर कारागृहात बंद असलेला अक्कू यादव न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिस संरक्षणात आला होता. तेव्हा पोलिसांनी अक्कू यादवला कोर्टाच्या बॅरेकमध्येच ठेवले होते. बॅरेकच्या बाहेर दोन पोलीस पहारा देत होते. त्यानंतर अचानक 200 लोकांचा जमाव कोर्टात घुसला. जमावाच्या हातात दगड, मिरची पूड आणि धारदार शस्रे होती. संतप्त जमावाने अक्कू यादवला कोर्टाच्या बॅरेकमधून बाहेर काढले आणि कोर्ट रूममध्येच त्याची हत्या केली. ज्या दिवशी न्यायालयातील न्यायाधीश त्याच्या जामिनावर निकाल देणार होते, त्या दिवशी संतप्त जमावाने अक्कू यादवला मृत्यूची शिक्षा सुनावली.
अक्कू यादव असा झाला कुख्यात गुन्हेगार
भरत कालीचरण उर्फ अक्कू यादव याचा जन्म नागपुरातील कस्तुरबा नगर या झोपडपट्टीत झाला. त्याला संतोष यादव आणि युवराज यादव हे दोन भाऊ होते. अक्कू, संतोष आणि युवराज हे तिघेही भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. 1980 च्या दशकात अक्कू यादव आणि त्यांचे कुटुंब कस्तुरबा नगरच्या झोपडपट्टीत राहायचे आणि लहान-मोठे गुन्हेगारी काम करायचे. त्यावेळी कस्तुरबा नगर झोपडपट्टीत गुन्हेगारांच्या दोन टोळ्या सक्रिय होत्या. अक्कू यादव एका टोळीशी संबंधित होता.
दोन्ही टोळ्यांना संपूर्ण वसाहतीत आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. या कारणावरून दोन टोळ्यांमध्ये आमने-सामने हाणामारी होत होती. 1990 पर्यंत अक्कू यादव मोठा गुंड बनला होता. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अक्कू यादववर जवळपास २६ गुन्हे दाखल होते. यामध्ये सामूहिक बलात्कार, खून, दरोडा, धमकावणे, बेकायदेशीर खंडणी याचा समावेश होता. 1999 मध्ये पहिल्यांदा पोलिसांनी अक्कू यादवला अटक केली होती.
अक्कू यादवच्या दहशतीची कहाणी
नागपूरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब कुटुंबांना त्रास देण्यात अक्कू यादव याने कोणतीही कसर सोडली नाही. अक्कू यादव कॉलनीत राहणाऱ्या लोकांकडून पैसे उकळायचा आणि पैशासाठी त्यांचे अपहरण करायचा. तो महिला आणि मुलींवर बलात्कार करायचा. त्याची पोलिसांवर मेहेरबानी असल्याने पोलिसांनीही अक्कू यादववर कडक कारवाई केली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्कू यादवने 40 हून अधिक महिलांवर बलात्कार केला होता. गुन्हा करत असताना अक्कू यादव हा रानटी पशू बनला आणि त्याने सर्व वयोगटातील महिलांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याचे बळी 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलींपासून ते 70 वर्षांच्या वृद्ध महिलांपर्यंत होते.
अक्कू यादवची गुन्हा करण्याची पद्धत
कस्तुरबा नगर वसाहतीमध्ये अक्कू यादव जेव्हा कधी बाहेर यायचा, तेव्हा त्याच्या भीतीमुळे कॉलनीतील महिला मुलांसह घरात लपून बसायच्या. या काळात अक्कू यादव याला कोणतीही स्त्री किंवा मुलगी दिसली की, तो तिला उचलून आपल्या अड्डयावर वर घेऊन जायचा आणि मनाला समाधान मिळेपर्यंत तिच्यावर अत्याचार करत असे. एकदा त्याचे समाधान झाले की, तो त्या स्त्रीला अत्यंत क्रूर पद्धतीने मृत्यू द्यायचा.
त्यानंतर बेलगाम क्रूर अक्कू यादवच्या विरोधात वातावरण तापू लागले. त्याच्या गुन्ह्यांच्या तक्रारी पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू लागल्या. राज्यातील पोलिसांची खालावलेली प्रतिमा पाहता 2004 मध्ये प्रशासनाने अक्कू यादववर कडक कारवाई करून त्याला तडीपारीची शिक्षा सुनावली, मात्र, भ्रष्ट पोलिसांमुळे तो कस्तुरबा नगर वसाहतीत लपून बसला. अक्कू यादवच्या भीतीने तेथे राहणारे पुरुष गप्प बसले, मात्र कॉलनीतील महिलांमध्ये त्याच्याविरुद्धचा रोष वाढू लागला.
एके दिवशी वसाहतीत राहणाऱ्या उषा नावाच्या महिलेने अक्कू यादवच्या विरोधात आवाज उठवला, त्याचा परिणाम कॉलनीत राहणाऱ्या इतर महिलांवरही होऊ लागला. वसाहतीमधील लोक संतापले, तेव्हा अक्कू यादव त्याच्या संपूर्ण टोळीसह तेथून फरार झाला. यावेळी संतप्त जमावाने त्यांचे घर पेटवून दिले. अखेर अक्कू यादवने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 13 ऑगस्ट 2004 रोजी अक्कू यादव कोर्टात हजर राहण्यासाठी पोहोचला, तेव्हा वसाहतीतील महिलांना याची माहिती मिळाली, त्या सुनावणी सुरू होण्यापूर्वीच कोर्टात पोहोचल्या.
अक्कू यादव महिलांसमोर येताच, प्रथम सर्व महिलांनी मिळून पोलीस कर्मचारी आणि अक्कू यादव यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. यामधून अक्कू यादवला सावरण्याची संधी न देता महिलांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. महिलांनी अक्कू यादव ठार होईपर्यंत त्याच्यावर हल्ला केला. अखेर, अक्कू यादवचा अंतही त्याच्या गुन्ह्यांसारखा झाला. पोलिसांनी अक्कू यादवच्या हत्येप्रकरणी 200 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. काही दिवस कोर्टात केस सुरू राहिल्यानंतर सर्व महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.