लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन चौकाजवळ दोन दुचाकी व बसचा तिहेरी अपघात 10 जुनला झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या ज्ञानेश्वरीचा उपचारादरम्यान सोमवारी (ता.२२ जुलै) मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वरीची मृत्यूची सुरु असलेली झुंज अखेर ४२ दिवसानंतर संपली. तिच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
ज्ञानेश्वरी शामराव लाटे (वय-१९, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी ज्ञानेश्वरीचा मामा शिवराम बन्सी कराड (वय-38, रा. एम.आय.टी. स्टाफ क्वार्टर, लोणी स्टेशन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपीएल चालक सोमनाथ बाळासाहेब बसाटे (वय-४५ रा महारूद्रा वास्तु कवडीपाट टोलनाका ता. हवेली जि. पुणे) व दत्ताराम रमेश कांबळे (वय-३४, गंगानगर फुरसुंगी हडपसर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवराम कराड व ज्ञानेश्वरी लाटे हे दोघे नात्याने मामा-भाची आहे. ज्ञानेश्वरी ही तिच्या मामाकडे राहत होती. ती वाघोली येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. कॉलेजला जाण्यासाठी तीचा मामा दररोज तिला दुचाकीवरून बस स्टॉपपर्यंत सोडवीत होते. दरम्यान, ज्ञानेश्वरीला शाळेत सोडविण्यासाठी जाताना १० जुनला अपघात झाला.
ज्ञानेश्वरी गाडीवरून उडून पीएमपीएल बसच्या समोर पडल्याने तिला बसने १० ते १२ फुट फरफटत नेले होते. ज्ञानेश्वरीला उपचारासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्ञानेश्वरीवर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ज्ञानेश्वरीची तब्बेत खालावल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. तिचा उपचारादरम्यान सोमवारी (ता.२२ जुलै) मृत्यू झाला. अखेर मृत्यूची सुरु असलेली झुंज ४२ दिवसानंतर अपयशी ठरली.