लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका नामांकित हॉटेलच्या वेटरने रस्सीच्या सहाय्याने अॅंगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात सोमवारी (ता.22) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
विक्रम प्रकाश जाधव (वय -25, सध्या रा.कदमवाकवस्ती, मुळ रा. असोला जि. यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम जाधव हा मागील काही महिन्यांपासून हॉटेल Grand 11 Family & Restruant मध्ये वेटर म्हणून काम करीत होता. शिंदे हा इतर कर्मचाऱ्यांसह वाकवस्ती परिसरात रूममध्ये राहत होता.
विक्रम जाधव याचे सहकारी मित्र नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करण्यासाठी गेले होते. तर जाधव हा एकटाच रुममध्ये होता. दुपारी एक वाजता त्याचे मित्र घरी आले . तेव्हा रूम चा दरवाजा आतून बंद होता. मित्रांनी जोरजोरात आवाज दिला, दरवाजा वाजविला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मित्रांनी दरवाजा तोडला असता, आणि घरात पाहिले असता, विक्रम जाधव हा अॅंगलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्यानंतर विक्रम जाधव याच्या मित्रांनी या घटनेची माहिती त्वरित लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, ईश्वर भगत व शिवाजी दरेकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विक्रम जाधव यांचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने खाली काढला. व शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, विक्रम जाधव याला दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जाधव याने आत्महत्या का केली? त्यादृष्टीने पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.