मुंबई : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडेन सिरपची तस्करीच्या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) पर्दाफाश केला आहे. एनसीबीने या कारवाईत तीन तस्करांना अटक करत त्यांच्या जवळून १५ लाख रुपये किमतीच्या कोडेन सिरपच्या तीन हजार बाटल्या जप्त केल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील लखनौ येथून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडेन सिरपची तस्करी करणारे एक मोठे रॅकेट अॅक्टिव्ह असल्याची माहिती एनसीबी मुंबईच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, एनसीबी मुंबईचे प्रमुख अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने रॅकेटचा माग काढण्यास सुरुवात केली. यात रॅकेटकडून बेकायदेशीर तस्करीसाठी वेगवेगळ्या वाहतूक सेवांचा वापर केला जात असल्याचे उघड झाले. लखनौमधून कोडेन सिरपची एक मोठी खेप मुंबईसाठी येणार असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार एनसीबीच्या पथकाने उल्हासनगर पोलीस ठाण्याजवळ सापळा रचून एस. आर. अहमद, एम. अस्लम आणि वाय. खान या तीन तस्करांना उल्हासनगरमधील परिवहन सेवेकडून तस्करीचे पार्सल घेताना पकडले. त्यांच्याजवळ १५ लाख रुपये किमतीच्या ३०० किलो वजनाच्या कोडेन सिरपच्या तीन हजार बाटल्या सापडल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करून एनसीबीने तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून काही वर्षांपासून ड्रग्ज तस्करी सुरू असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे एनसीबीने सांगितले.