नांदेड: जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे आता भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील झाल्याचे दिसून येत आहेत. सुरुवातीला भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार अंतापुरकर यांनी आपल्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एक वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. त्यानंतर या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नव्हता. याबरोबरच राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. दरम्यान अंतापूरकर हे थोड्याच दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात सुरु झाली आहे.