नाशिक : पक्षांतर्गत कारवाईची टांगती तलवार असलेले इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर रविवारी (दि. २१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील आनंदाश्रमात दाखल झाल्याने त्यांच्या आगामी भूमिकेबद्दल जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
विधानपरिषदेच्या गत आठवड्यात पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस वोटींग केले. त्यांच्या पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. क्रॉस वोटींग केल्याचा आरोप असलेले आमदार हिरामण खोसकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील आनंदाश्रमात पोहोचल्याने राजकीय चर्चा सुरू आहेत.
या भेटीनंतर इगतपुरी मतदार संघातील अतिक्रमण संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली, असे स्पष्टीकरण आमदार खोसकर यांनी दिले आहे. मात्र, काही दिवसांपासून ते शिंदे गट किंवा अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खोसकर यांनी काही दिवसांपूर्वीच नाना पंटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज असल्याचे म्हटले होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसने ज्या आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये खोसकर यांचाही समावेश आहे का? याबाबतची चर्चा आहे.