केज: जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर पसरवू नयेत. असे प्रशासनाने आवाहन केल्यानंतर सुद्धा दोघांनी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडिओ ठेवून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना २० जुलै रोजी अशी गोपनीय माहिती मिळाली की, अनिकेत सरवदे नावाच्या इसमाने त्याच्या इस्टाग्राम या सोशल मिडीया साईटवर एका व्हिडिओमध्ये प्रार्थना स्थळावर हातोडा मारून ते तोडत असल्याचे दिसत होते आणि ही तर सुरुवात आहे भावा. असे वाक्य लिहलेली पोस्ट होती. ही आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ संजय लोंढे नावाच्या इसमाच्या इस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरीला शेअर केला होता. या सर्व माहितीवरून पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांच्या फिर्यादीवरून अनिकेत सरवदे (रा. कुंबेफळ ता. केज) व संजय लोंढे (रा. लोंढे गल्ली, केज) याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.