अमरावती : पतीचे हातपाय बांधून पत्नीवर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ही घटना शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 19) घडली आहे. याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडित 60 वर्षीय महिलेने शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपी अब्दुल नईम ऊर्फ नम्मू अब्दुल अली (वय-31, रा. मच्छीसाथ, करजगाव) व प्रकाश पानसे (वय-25, रा. भालेवाडी, करजगाव, ता. चांदूर) या दोन आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या झोपडीत असताना अब्दुल नईम आणि प्रकाश पानसे हे दोघेही तेथे आले. त्यांनी महिलेचा हात पकडून तिला जबरदस्तीने बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेच्या पतीने कोठे घेऊन जात आहेत, असा जाब विचारला. त्यावेळी प्रकाशने महिलेच्या पतीचे हातपाय लुगड्याने बांधून पलंगाला बांधून ठेवले. त्यानंतर दोघांनीही महिलेला बाहेर ओढत नेले. त्यानंतर अंधारात एका झाडाजवळ नेले. महिलेने प्रचंड विरोध केला असता तिला बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोघांनीही महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला.
या घटनेनंतर पीडित महिला बेशुध्द पडली. ती रात्रीच्या वेळेत शुध्दीवर आली. त्यानंतर महिलेने आपल्या घरी जाऊन पतीचे हातपाय सोडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरजगाव कसबा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेला शासकीय रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.