बारामती : स्टे ऑर्डर जमा करून घेण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती ४ हजार ५०० रुपये स्वीकारणाऱ्या सहायक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत अटक केली आहे. अनिलकुमार संभाजी महारनवर (वय-४८, रा. डेकळवाडी, ता. बारामती) असं अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई प्रशासकीय भवन येथील सहायक निबंधक कार्यालयात शुक्रवारी (दि. १९) करण्यात आली.
महारनवर हे येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी श्रेणी २ पदावर कार्यरत आहेत. त्यांनी न्यायालयातून स्टे ऑर्डर आणली होती. त्याची प्रत घेऊन साडेचार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याबाबत महारनवर याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन हरीभाऊ नस्टे (रा. काझड, ता. इंदापूर) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, नरुटे यांची जमिनीसंदर्भातील केस सध्या विभागीय सहनिबंधकांकडे सुरू होती. त्यांच्या निर्णयाविरोधात नरुटे हे सहायक निबंधक कार्यालयात गेले होते. ही प्रत जमा करून घेण्यासाठी महारनवर यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. मात्र, त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
लाचलुचपत विभागाने प्रतिबंधक तक्रारीची पडताळणी करत पंचांना सोबत घेत सापळा रचत कारवाईचे नियोजन केले. तडजोडीअंती माहारनवर यांना ४ हजार ५०० रुपये स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक निंबाळकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.