दीपक खिलारे
इंदापूर : शेती महामंडळाच्या कामगारांना राहण्यासाठी 2 गुंठे जागा व नवीन घराच्या मागणीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बरोबर तात्काळ बैठक घेऊन, सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढू, अशी ग्वाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
वालचंदनगर येथे शेती महामंडळाच्या कामगारांच्या जागा व घराच्या मागणी संदर्भात 18 जुलै पासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या घनश्याम निंबाळकर, हर्षवर्धन गायकवाड, प्रकाश धांडोरे, अतुल बनसोडे या सामाजिक कार्यकर्त्यांची व शेती महामंडळाच्या कामगारांच्या कुटुंबीयांची पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी उपोषण स्थळी शनिवारी (दि. 20) भेट देऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली.
या प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शेती महामंडळाच्या कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी गेली 30 वर्ष मी सहकार्य केले आहे. आताही शेती महामंडळाच्या कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी सहकार्याची भूमिका राहील, त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक घेऊन सर्व मागण्या निश्चितपणे सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
याप्रसंगी कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड, राजेंद्र बोंद्रे, शिवशरण, तसेच शेती महामंडळाचे कामगार व कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.