नांदेड : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रा सध्या नांदेड जिल्ह्यातून जात असताना काल रात्री ९ च्या सुमारस अपघात झाला असून यात सहभागी असणाऱ्या एका ट्रकने दोघांना उडवले आहे. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे.
भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील चौथा दिवस होता. नवीन मोंढा परिसरातील सभा झाल्यानतंर यात्रा महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाली.
रात्री नऊच्या सुमारास महादेव पिंपळगाव येथील नांदेड-अकोला महामार्गावरून पायी चालणाऱ्या गणेशन (६२) आणि सययुल (३०) या दोघांना ट्रकने धडक दिली. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गणेशन यांचे निधन झाले. तर सययुल याच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत.
अपघाताचे वृत्त कळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार मोहन हंबर्डे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. रात्री साडेबारापर्यंत चव्हाण रुग्णालयात होते. गणेशन यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.