मुंबई : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठं यश मिळालं होतं. मात्र निवडणूक चिन्हावरून मात्र त्यांच्या उमेदवाराचा घात झाला होता. लोकसभा निवडणुकीत पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मतं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी पिपाणीला मिळाली होती. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. या प्रकरणी निवडणूक आयोगाने निकाल दिला असून ‘पिपाणी’ चिन्ह आयोगाने गोठवलं आहे. ‘पिपाणी’ चिन्ह गोठवल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आलेल्या तुतारी चिन्हाला विरोधकांनी पिपाणी दाखवून चांगलेच आव्हान दिले होते. त्यामुळे राट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या ‘पिपाणी’ चिन्हामुळे मोठा फटका बसला होता. शरद पवार यांनी ‘पिपाणी’ या चिन्हावर आक्षेप घेतला होता. येत्या विधानसभा निवडणुकीत तुतारीचा प्रभाव कमी करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे बंद होणार आहे.
शरद पवार गटाची तुतारी आणि अपक्ष उमेदवारांची पिपाणी ही दोन्ही चिन्हे सामान्यतः ‘तुतारी’ म्हणून ओळखली जातात, असा उल्लेख पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत केला होता. लोकसभा निवडणुकीत ‘पिपाणी’ या चिन्हामुळे आपलं नुकसान झाल्याचं शरद पवार गटाने म्हटलं होत. लोकसभेची निवडणूक पक्षाने ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक न समजल्यामुळे शरद पवार गटाचा सातारा लोकसभेत पराभव झाल्याच बोलल जात आहे.
तसेच, ग्रामीण भागात तुतारी व पिपाणी यात फरक कळला नाही. त्यामुळे बीड लोकसभेत पिपाणी चिन्हावरही भरभरुन मतदान झाल्याचे मतमोजणीच्या आकड्यांवरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे वंचित आघाडीच्या उमेदवारांपेक्षा पिपाणी चिन्हाला अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने गोठवलेल पिपाणी हे चिन्ह, शरद पवार गटाला दिलासा देणार आहे.