हडपसर : वानवडी येथील महापालिकेच्या हद्दीतील शिवरकर दवाखान्यासमोरील वस्तीमध्ये भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. १०) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अग्निशमन दलाच्या कोंढवा खुर्द येथील आणि इतर केंद्राच्या सहा गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग लागल्याचं समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी गावातील शिवरकर वस्ती येथील एका खोलीत असलेल्या मंडपाच्या सामानाला आग लागली. नागरिक झोपेत असताना आगीच्या झळा येत असल्याचे जाणवल्यावर ते जागे झाले.
आग लागल्याचे समजताच वस्तीतील नागरिक भयभयीत होऊन घराबाहेर पळत सुटले. नागरिकांनी भीषण आग पाहुन आपआपल्या घरातील सिलेंडर बाहेर काढले.
दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आग विझल्याचं कळताच परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. मात्र या आगीत अनेक नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं आहे.