संतोष पवार
पुणे : वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे. समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या हेतूने राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव राबवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. राज्यातील सर्व माध्यमे तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षामध्ये महावाचन उत्सव २०२४ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याकरिता प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रॅण्ड ॲम्बिसेडर म्हणून निवड करण्यास राज्य सरकारच्या शालेय विभागाने मान्यता दिली आहे. हा उपक्रम २२ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान राबवला जाईल.
इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी अशा तीन गटांत विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला जाईल.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी उपक्रमांचा शुभारंभ झाला. ६६ हजार शाळा आणि ५२ लाख विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. त्याच पार्श्र्वभूमीवर यंदा महावाचन उत्सव २०२४ उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला.
विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, भाषा संवाद कौशल्य विकसीत करणे आणि मराठी भाषा साहित्य संस्कृतीशी नाळ जोडणे ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. त्याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत स्वतंत्र वेब पोर्टल विकसित करण्यात येईल. वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करून विद्यार्थी लिखित स्वरूपात तो विचार संबंधित पोर्टलवर अपलोड करतील. वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारी एक मिनिटाची ध्वनीफित ध्वनिचित्रफीत पोर्टलवर अपलोड करतील.
ग्रंथालये प्रदर्शन पुस्तके मेळाव्यांचे आयोजन करण्यात येऊन विद्यार्थ्यांना तालुका जिल्हा शैक्षणिक विभाग राज्य स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. त्यासंबधीचा शासन निर्णय १६ जुलै २०२४ रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने जारी केला आहे.